वारी

 वारी शब्दाचा अर्थ म्हणजे येरझार. पंढरपूराची वारी करावयाची म्हणजे आपल्या घरुन पायी चालत पांडूरंगाच्या भेटीला पंढरपुराला जायचे आणि भगवंताला भेटून परत घरी यावयाचे. वारकरी वर्षातून अनेकदा वारीला जातात. अनंत भगवान ठेवील त्याप्रमाणे राहायचे; त्याने दिलेला उदरनिर्वाहाचा मार्ग स्वीकारून निर्वाहापुरते अन्न, आच्छादनाची व्यवस्था करावयाची. तहानलेल्याची तहान जाणायची, भुकेलेल्या जीवाला अन्न द्यायचे, परस्त्रीला मातेसमान मानायचे, कोणत्याही जीवाचा मत्सर करावयाचा नाही, त्यांच्या कल्याणाची प्रार्थना करावयाची, संतावर प्रेम ठेवायचे, गीता भागवताचे वाचन करावयाचे, आपल्या सर्व कार्याच्या केन्द्रस्थानी भगवंताला ठेवायचे, धर्मपूर्वक गृहस्थ आश्रमाचे पालन करावयाचे,आणि भगवत धर्माचा मार्ग सुकर बनवायचा, असे वारक-यांचे भक्तिमय जीवन असते. अनेक भक्त एकत्र येऊन भजने गात, कथा करीत पंढरपूरला पायी जातात तेव्हा त्यांच्या समूहाला ‘दिंडी’ असे म्हणतात. वर्षातील आषाढ शुक्ल एकादशीच्या पर्वावर संपूर्ण महाराष्ट्रातून गावोगावच्या, देवस्थानच्या दिंडया पंधरा ते वीस दिवसांचा पायी प्रवास करुन पंढरपूरात भगवान श्रीविठ्ठ्लाच्या दर्शनास येतात. वारीची ही प्रथा फार जुनी आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील दिंड्यातील वारीला जात होते. असे सांगीतले जाते. पूर्वी प्रवासाची साधने फारशी नव्हती. त्यामुळे लहान लहान समूहाने लोक पंढरपूरला जात असत. त्यामुळे ही प्रथा किती जुनी आहे याचा अंदाज करता येणार नाही. परंतु ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारच्या पदरी सेनाधिकारी असलेल्या हैबतराव बाबा आरफळकर यांनी या दिंड्यामध्ये सूसुत्रता आणली. ते ज्ञानेश्वराच्या पादुका पंढरपूरला घेऊन जात असत. तुकाराम महाराजही पंढरपूरची वारी करत असत. त्यांच्या चिरंजीवांनी नारायण महाराजांनी सन १६८५ साली श्रीतुकाराम महाराज व ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका पंढरपूराला घेऊन जाण्याची प्रथा सुरु केली. दिंडी सोहळ्याच्या या दोन परंपरा चालत आलेल्या आहेत.

वारी
Scroll to top